🎤 कोजागिरी पौर्णिमा स्पेशल ओपन माईक 🎤
मनातल्या भावनांना शब्दाची जोड मिळाली कि साहित्य तयार होते, आणि मनासारखा मंच मिळाला कि पानावरचे साहित्य जनात येते. आणि म्हणूनच महाराष्ट्र मंडळ अबुधाबीच्या हौशी साहित्यिक कलावंतांना रसिक मायबापांची दाद मिळावी, ह्यासाठी कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने घेऊन येत आहोत, महाराष्ट्र मंडळाच्या इतिहासातील पहिलावहिला Open Mic कार्यक्रम.
मंडळाच्या सर्व सदस्यांना आवाहन कि, आपल्या मनाच्या कोपऱ्यात अलगदपणे जपून ठेवलेलं आठवणींचं, शब्दांचं गाठोडं उघडा. आपल्यातील दडलेल्या कवीला, कथाकाराला, वक्त्याला, नकलाकाराला व विनोदवीराला प्रोत्साहित करा आणि सामील व्हा ह्या मरुबनातील अनोख्या मैफिलीमध्ये.
सहभागी कलावंतांसाठी काय नियमावली आहे?
१) तीन-मिनिटांचा अवधी: प्रत्येक सहभागी कलावंताला प्रेक्षकांना मोहित करण्यासाठी ३-मिनिटांचा वेळ मिळेल. ही वेळ मर्यादा कार्यक्रम गतिमान राहील व जास्तीत जास्त कलावंतांना कार्यक्रमात सहभागी होता येईल ह्यासाठी सुनिश्चित केली आहे.
२) स्वरचित कला सादरीकरण: सर्व सादरकर्ते फक्त आणि फक्त स्वतः लिहिलेले मराठी साहित्यच रसिकांसमोर प्रदर्शित करतील. सर्व कलावंतांस सर्जनशील स्वातंत्र्य आहेच परंतु, आपली कलाकृती आदरणीय, गैर-आक्षेपार्ह, यूएई मधील नियमांचा आदर करून आणि विविध वयोगटातील प्रेक्षकांसाठी योग्य अशी रचलेली असेल याची काळजी घ्यावी.
३) नोंदणी: सर्व इच्छुक कलावंतांनी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आगाऊ नोंदणी करणे आवश्यक आहे. खाली नमूद केलेल्या नोंदणी लिंकवर १४ ऑक्टोबर २०२३ पूर्वी आपल्या सहभागाची नोंदणी करावी. केवळ महाराष्ट्र मंडळ अबूधाबीचे १८ वर्षांवरील वैध सदस्य नोंदणीसाठी पात्र राहतील.
४) ऑडिओ क्लिप: सर्व कलाकारांना आपण सादर करणारी कलाकृती ऑडिओ क्लिपद्वारे कार्यकारी समितीला प्रस्तुत करावी लागेल. सर्व नोंदणी केलेल्या इच्छुक सहभागी कलाकारांना त्याची लिंक देण्यात येईल. कार्यक्रमाचे आयोजन करणे, सादरीकरणाचा क्रम ठरवणे व कार्यक्रमाची रंजकता वाढवणे हा यामागचा उद्देश आहे. तुमच्या कलाकृतीची गोपनीयता व आदर समितीद्वारे योग्य रीतीने राखला जाईल ह्याची शाश्वती आम्ही समिती सर्व कलाकारांना देतो.
महाराष्ट्र मंडळ अबुधाबीच्या सर्व सदस्यांना आवाहन करतो की, जास्तीत जास्त संख्येने या अनोख्या रंगमंचावर या व आपली कला रसिक प्रेक्षकांसमोर सादर करा.
धन्यवाद,
महाराष्ट्र मंडळ अबुधाबी
कार्यकारी समिती 2023-24